बीड – राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत च्या प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने गुरुवारी दिले आहेत .त्यामुळे या वर्षाखेरीस नगर परिषद निवडणुकांचा बिगुल वाजणार हे निश्चित झाले आहे .जिल्ह्यातील पाच नगर पंचायत आणि सहा नगर पालिकेच्या निवडणुकांमध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे .
मुदती संपणाऱ्या व नवनिर्मित नगरपरिषदा, नगरपंचायतींची व्यापकता विचारात घेता प्रभाग रचना वेळेवर अंतिम करणे सुकर व्हावे म्हणून प्रारूप प्रभाग रचनेची कार्यवाही सुरु करणे आवश्यक आहे. शासनाने १२ मार्च, २०२० रोजी प्रसिध्द केलेल्या महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अधिनियम, २०२० अन्वये सर्व नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पध्दती लागू केली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभाग हा एक सदस्याचा असेल.
तसेच प्रभाग रचनेसाठी जनगणना कार्यालयाने प्रसिध्द केलेली लोकसंख्येची अलिकडची आकडेवारी म्हणजेच सन २०११ ची लोकसंख्या विचारात घ्यावयाची आहे. त्यानुसार सदस्य संख्या निश्चित करून तितक्या प्रभागांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा करण्यात यावा. परिस्थिती लक्षात घेता प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीच्या कार्यवाहीसाठी लागणारा कालावधी विचारात घेता व निवडणुका मुदत समाप्तीपूर्वी पार पाडणे शक्य व्हावे, यासाठी सध्या प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात यावा. सदर कच्चा आराखडा तयार करण्याची कार्यवाही ही दिनांक २३ ऑगस्टपासून सुरू करण्यात यावी. कच्चा आरखडा तयार होताच आयोगाला तात्काळ सादर करावे असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना दिले आहेत