बीड – बीड पंचायत समितीमध्ये 2011 ते 2019 या दरम्यान झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात कमालीचा हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप हे या पदावर काम करण्यास सक्षम नसल्याचे निरीक्षण औरंगाबाद उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.नरेगाच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्यांची चौकशी करण्यात कमी पडलेल्या एखाद्या जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यावर न्यायालयाने थेट नाव घेऊन ताशेरे ओढण्याची ही पहिलीच घटना असावी .
बीड पंचायत समिती मध्ये रोजगार हमी योजना अर्थात नरेगा अंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे केल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले .2011 ते 2019 या आठ नऊ वर्षात खडीकरण,रोड दबाई, खडी दबाई,मुरूम दबाई,मुरूम वाहतूक,वाळू वाहतूक या नावाखाली गुत्तेदार पोसण्याचे काम करण्यात आले .
आर बी लाटे,नाथकृपा,गणेश ट्रेडर्स,भाग्यलक्ष्मी ट्रेडर्स, सिद्धेश्वर अर्थमूव्हर्स,साई ट्रेडर्स, दत्तकृपा ट्रेडिंग कंपनी,माऊली ट्रेडर्स, अश्विनी ट्रेडर्स, ओम ट्रेडर्स आणि इतर लोकांनी कोट्यावधी रुपये रोड दबाई,खडी मुरूम,मुरूम वाहतूक,वाळू वाहतूक,खडी दबाई,या नावाखाली उचलले असल्याचे न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले आहे .या अशा गुत्तेदारांमुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे यामुळे समोर आले आहे .या सर्व गुत्तेदारांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून त्यांच्याकडून अपहातातील रक्कम वसूल केल्याशिवाय असे प्रकार बंद होणार नाहीत .
या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी राजकुमार देशमुख यांनी जनहित याचिका दाखल केली होती .या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकारी बीड यांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.मात्र जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी अहवाल उशिरा सादर केला तसेच या अहवालात काहीही स्पष्ट होत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले .
त्यामुळे बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप हे या पदावर काम करण्यास सक्षम नाहीत,ते या चौकशीत पारदर्शकता ठेवू शकत नाहीत,ते या पदावर राहिल्यास हा भ्रष्टाचार दाबला जाऊ शकतो असे म्हणत न्यायालयाने राज्याचे मुख्य सचिव यांना तातडीने जगताप यांनी बदली करून त्यांच्या जागी नवीन जिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत .तसेच या जिल्हाधिकारी यांनी येत्या 18 ऑगस्ट रोजी सुनावणीस हजर राहून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत .
पंचायत समिती मध्ये झालेल्या या घोटाळ्यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची बदली करण्याचे थेट आदेश न्यायालयानेच दिल्याने खळबळ उडाली आहे .दप्तर दिरंगाई चा हा नमुना चर्चेत आला आहे .