February 8, 2023

महाराष्ट्राची ऊर्जा – अजित पवार !!

महाराष्ट्राची ऊर्जा – अजित पवार !!

धनंजय मुंडे – मंत्री सामाजिक न्याय तथा विशेष सहाय्य ,महाराष्ट्र राज्य

लीकडच्या राजकारणात दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी प्रसंगी नुकसान सहन करतील, टीका आणि टोकाचा विरोध सहन करतील पण दिलेला शब्द पाळणारच, असे नेते बोटावर मोजण्याइतकेच आहेत. त्यापैकीच आवर्जून नाव घ्यावं ते आदरणीय अजितदादांचं!

बोले तैसा चाले… ही म्हण लिहिणाऱ्याने त्या काळात अजित दादांसारख्याच कुणालातरी डोळ्यासमोर ठेवून लिहिलेली असावी, याची प्रचिती मला कित्येक अनुभवातून आली आहे. माझ्या राजकीय जडणघडणीत, आज मी आहे त्या पदासहित आजवर मी जी कामे करू शकलो त्या सर्वांमध्ये दादांचे योगदान मला ती प्रचिती व अनुभूती आजवर देत आले आहे.

लॉकडाऊन काळात सगळं बंद असताना सकाळी 7 वाजल्यापासून रात्री उशिरा पर्यंत दादांचे मंत्रालयातील कार्यालय सुरू असायचे. स्वतः दादा बसून असायचे, महाराष्ट्राचे अर्थचक्र चालावे म्हणून कोणी असो नसो, दादांचे कार्य मात्र अविरत सुरू असायचे!

दादांची केबिन सकाळपासून अगदी मध्यरात्री पर्यंत सुरू असते, दादांच्या अविरत कार्यशैलीची हीच ती प्रेरणा आहे जी माझ्यासारखे असंख्य तरुण राजकारणात नव्याने काम सुरू करताना शिकायचा प्रयत्न करतात!

आम्ही मुंडे कोणत्याही कार्यक्रमाला कधी वेळेवर जात नाहीत अशी चर्चा असते, दादांच्या बाबतीत हे उलट आहे, कोणी नाही आलं तरी चालेल पण दादा कार्यक्रम, बैठक किंवा अगदी प्रचारसभा का असेना दिलेल्या वेळीच हजर होणार! बऱ्याचदा दादा लवकर आल्याने आमची तारांबळ सुद्धा होत असते.

दादा पहिल्यांदा आमच्या परळीला आले तेव्हा दिलेला शब्द त्यांनी एक क्षणात पूर्ण केला आणि कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी त्यांनी परळी शहराला दिला. पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवला. परळीला पाणी देणारे ते भगीरथ ठरले. दादा दिलेल्या शब्दावर किती ठाम असतात याची प्रचिती त्या दिवशी मला प्रथमच आली. आजही आमच्या परळीतील नगरोत्थान योजनेसाठी वाढीव निधी मागताच दादांनी नवीन प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

दादांच्या अंगी असलेल्या स्पष्ट व सडेतोड वाणीमुळे आणि आजकाल सोशल मीडियाच्या वाढलेल्या अति वापरामुळे दादांच्या अंगी असलेल्या सकारात्मक सद्गुणांना बाजूला ठेऊन त्यांच्यावरील क्रीटीसीजमचा अधिक उदो उदो केला जातो, याचे वाईट वाटते. पण कोणत्याही टीकेमुळे खचतील ते पवार कसले?

माझ्यासारख्या राजकारणात व समाजकारणात काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्याला अजित दादांसारख्या माणसाची पाठराखण मिळणे ही त्यातल्या त्यात एक मोठी गोष्ट आहे. कारण ‘अनंत टीकेचे धनी’ अशीच आमच्या दोघांची ओळख अनेकवेळा माध्यमांसमोर मांडली जाते.

दादांचा कामे करण्याचा धडाका, लोकांशी जनसंपर्क, प्रशासनावरील मजबूत पकड, त्यांच्यातील धैर्य आणि संयम या अशा एक ना अनेक गोष्टी सांगता येतील, ज्या मी त्यांच्याकडे बघून शिकायचा प्रयत्न करतो आहे. सबंध राज्याने कोविड काळात या गोष्टी पाहिल्या व अनुभवल्या आहेत.

दादांच्या वक्तीशीरपणाबद्दल एक उदाहरण आवर्जून सांगावेसे वाटते. मागील आघाडी सरकारच्या काळात पुणे जिल्ह्यातील एक ग्रामीण जिल्हा परिषद शाळेच्या इमारत व आधुनीकीकरण कार्यक्रमास दादा पालकमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून येणार होते. जिल्हा परिषद अध्यक्ष, शिक्षण समिती, पदाधिकारी-अधिकाऱ्यांनी तसेच संबंधित शाळेने कार्यक्रमाची जय्यत तयारी केली. दादांनी त्यांना सकाळी 8.30 ची वेळ दिली. दादा उपमुख्यमंत्री आहेत, वेळेवर येतात असा निरोप होता, पण अधिकारी, पदाधिकारी 9-9.15 ला येण्यास सुरुवात झाली. जेव्हा सगळे शाळेत पोचले तेव्हा दादा ठीक 8.20 ला शाळेत आले, शाळकरी मुले व शिक्षकांसोबत कार्यक्रम उरकला व पुढील कार्यक्रमास निघून गेले अशी माहिती त्यांना मिळाली आणि त्यांची अक्षरशः भंबेरी उडाली. गंमतीचा भाग सोडा पण दादांचा हा वक्तशीरपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अजोड भाग आहे, आम्ही त्याकडे आदर्श म्हणून पाहतो!

आदरणीय पवार साहेबांच्या किमयेने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले, सामाजिक न्याय मंत्री म्हणून मी आणि अर्थमंत्री म्हणून दादांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्याच अर्थसंकल्पात दादांनी सामाजिक न्याय खात्याला भरभरून निधीची तरतूद केली. कोरोनाच्या काळात राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती चा विषय मी त्यांच्याकडे घेऊन गेलो तेव्हा एका तासात तो सोडवून तातडीने कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.

ऊसतोड कामगारांसाठी स्व. गोपीनाथराव मुंडे ऊस तोड कामगार महामंडळास दादांनी राज्यात ऊस पिकेल तोपर्यंत निधीची कमतरता भासणार नाही अशी कायमस्वरूपी आर्थिक तरतूद करून वर्षानुवर्षे विकासाच्या प्रवाहापासून दूर राहिलेल्या आमच्या ऊसतोड कामगार बांधवाना न्याय देण्यासाठी मोठे पाऊल उचलले. एवढेच नव्हे तर कामगारांच्या मुलांसाठी निवासी वसतिगृहे उभारण्याच्या योजनेसही दादांनी तात्काळ मंजुरी दिली. या वर्षीच्या पावसाळी अधिवेशनात दादांनी प्रथमच या महामंडळाला 20 कोटी रुपये भागभांडवल निधी उपलब्ध करून दिला आहे. माझ्यासाठी ही खूप मोठी उपलब्धी आहे.

दादा म्हटलं की आठवतात गेल्या दहा वर्षातल्या अनेक आठवणी, दादांनी किती संघर्ष केला, दादांच्या व्यक्तिमत्वावर विरोधकांकडून झालेल्या टीका, परंतु या टीकांना भीक न घालता दादांनी संकट काळात राज्याच्या हिताचे निर्णय घेऊन दाखवले हे शेतकरी कर्जमाफीच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राने पाहिलं.

दादांच्या कामांचा धडाका, प्रशासनावरील त्यांची मजबूत पकड याची वेळोवेळी अनुभूती येत असते. मागील काही दिवसांपूर्वी दादा आमच्या बीड जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी केवळ काही किलोमीटर प्रवासात बीड शहरातील स्वच्छतेवर बोट ठेवले आणि बीडच्या मुख्याधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. दुसऱ्याच दिवशी सबंध बीड शहर चकाचक झाले. दौऱ्यात असताना इतक्या बारकाईने निरीक्षण करणे, त्याचा संदर्भ लगेच समोरच्या बैठकीत ठेऊन ते काम करवून घेणे या बाबींमुळेच कदाचित दादा आज महाराष्ट्राचे दादा आहेत!

दादा आणि मी या नात्यामध्ये एक मजबूत धागा आहे त्या धाग्याचं नाव आदरणीय पवार साहेब ! जोपर्यंत साहेब आमच्या पाठीशी आहेत, कोणतेही षडयंत्र किंवा कोणतीही टीका हाणून पाडायची ताकत दादांमध्ये आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यात, गाव-खेड्यात दादांना मानणारा युवक वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. घड्याळापेक्षा जास्त वेळेवर चालणारे दादा उगाच कुणाला गप्पा मार्ट बसलेले कुणीही कधी पाहीले नाहीत, मात्र कार्यालयात भेटायला आलेल्या प्रत्येकाला वेळ देऊन त्याचे समाधान करण्याकडे दादांचा कटाक्ष असतो. दोन बैठकांच्या मधल्या वेळेत अधिकाधिक लोकांना भेटून त्यांना ताटकळत न ठेवणे व वेळेचा सदुपयोग करणे असा दुहेरी योग दादा साधतात.

आदरणीय दादा, आपण माझ्यासारख्या अनेकांचे प्रेरणास्थान आहात, आपण करत असलेलं काम, कोरोना सारख्या महामारी मध्ये आपण राज्यातील जनतेला दिलेला आधार आम्ही कधीही विसरणार नाही, तुम्ही मंत्रालयात बसून रोज सकाळच्या सात वाजल्यापासून मध्यरात्री पर्यंत लोकांसाठी केलेलं काम आम्ही कधीच विसरणार नाही; महामारी आणि आर्थिक संकट अशा दुहेरी कात्रीत असताना देखील अत्यंत संयमाने व धैर्याने तुम्ही आम्हाला सांभाळलत आणि हे करत असताना तुमचा संवेदनशील स्वभाव थोडाही डगमगू दिला नाहीत… म्हणूनच कदाचित ‘बोले तैसा चाले’ ही म्हण तुम्हाला तंतोतंत लागू होत असावी. पण या काळात तुम्ही स्वतःची काळजी देखील घ्या…

आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार जोपासत, दादांच्या हातून नेहमीप्रमाणेच कायम सत्कार्य घडो…. अशी नम्र विनंती आदरणीय दादांना या माध्यमातून करतो.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, दिलेला शब्द पाळणारच याप्रमाणे आम्हा कार्यकर्त्यांना न्याय देणाऱ्या महाराष्ट्राच्या दादांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि प्रभू वैद्यनाथकडे दादांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो…

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click