बीड – गुप्त बातमीदारकडून माहिती मिळाली,फोर्स सोबत घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली,पत्याच्या क्लबवर रेड देखील झाली मात्र गुन्हा काही दाखल झालाच नाही,क्लब राजकीय पक्षाच्या प्रमुखाचा असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जागेवरच तोडीपाणी केली अन सगळं प्रकरण अवघ्या काही लाखात मिटल अशी चर्चा शहरात सुरू आहे .
हा सगळा प्रकार बीड मध्ये घडला आहे .पोलिसांच्या खाकी वर्दीला डागळण्याचे काम अधिकारीच करत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे .बीड शहरातील जालना रोड भागात एका हॉस्पिटल शेजारी पत्याचा क्लब सुरू असून मोठ्या प्रमाणात जुगारी हजर असल्याची खबर गुप्त बातमीदारकडून मिळाली .खबर पक्की असल्याची खात्री झाली .
रेड करण्यासाठी आवश्यक फोर्स देखील मागवण्यात आला .सगळे अधिकारी कर्मचारी माहिती मिळालेल्या ठिकाणी गेले .रेड सक्सेस देखील झाली .मात्र हा क्लब एका राजकीय पक्षाच्या प्रमुखाचा असल्याचे सांगण्यात आले आणि प्रकरणाला वेगळे वळण मिळाले .
रेड टाकण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांचे अन प्रमुखाचे बोलणे झाले,जागेवर लक्ष्मीदर्शन झाले,ते ही थोडे थोडके नव्हे तर तब्बल तीन ते पाच लाख रुपये .एवढी रक्कम मिळत असेल तर क्लबवर पत्ते खेळणारे चाळीस असोत की पन्नास,कागद काळे करून काय मिळणार हा विचार संबंधित अधिकाऱ्याने केला अन कारवाई स्थगित झाली .
बीड पोलीस दलात कोरोनाच्या काळात आपल्या तापट स्वभावामुळे अडचणीत आलेल्या अन त्यातून सहीसलामत सुटलेल्या या अधिकाऱ्याच्या या कारनाम्यावर तरी वरिष्ठ लक्ष घालून कारवाई करणार का हाच खरा प्रश्न आहे .
ज्या प्रमुखांच्या क्लबवर कारवाई करण्यासाठी हे अधिकारी अन पथक गेले होते तो प्रमुख या अशा धंद्यासाठी खूप फेमस आहे .पांढरे कपडे घालायचे ,मोठं मोठ्या गप्पा मारायच्या अन पोलीस,महसूल मधील अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपले धंदे सुरु ठेवायचे हा त्याचा उद्योग बनला आहे .मात्र यामुळे आपल्या पक्षाची,पक्षप्रमुखाची इभ्रत धुळीला मिळत आहे याचा विसर त्याला पडला आहे .
रेड करून पन्नास लोकांना सोडून देत तोडीपाणी करणाऱ्या या पथकावर एसपी काही कारवाई करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे .