बीड – निलेश ढास या तरुणाच्या खून प्रकरणी अवघ्या चोवीस तासात नेकनूर पोलिसांनी तीन आरोपीना अटक केली आहे .मांजरसुंबा घाटात मृतावस्थेत सापडलेल्या लिंबागणेश येथील तरुणाचा अपघात नसून खूनच असल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणाचा उलघडा करून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.यातील मुख्य आरोपी मनोज घोडके हा मयत तरुणाचा मेव्हणा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे .
मंगळवारी सकाळी बुलेटवर एका तरुणाचा मृतदेह मांजरसुंबा घाटात आढळून आला होता. अपघात झाल्याचे भासवण्यात आले असले तरी हा खून असल्याचे पाहताक्षणी नेकनूर पोलीस ठाण्याचे सपोनि लक्ष्मण केंद्रे यांच्या लक्षात आले. तपासाअंती सदरील मयत तरुण निलेश शहादेव ढास (वय 25, रा. लिंबागणेश) हा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून केंद्रे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. यातील मुख्य आरोपीला मयत तरुणाच्या दाजीला काही तासात बेड्या ठोकत इतर दोन आरोपींना आज सकाळी ताब्यात घेतले.
निलेश ढास हा सोमवारी दवाखान्यात मामाला भेटण्यासाठी गेला होता. तो मंगळवारी सकाळी मांजरसुंबा घाटात मयत अवस्थेत आढळला. बुलेटचा अपघात झाल्याचे भासविण्यात आले होते, मात्र घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर हा प्रकार खुनाचा असल्याचे सपोनि लक्ष्मण केंद्रे यांनी ओळखले. तातडीने तपासाला गती देत यातील मुख्य आरोपी तथा मयत युवकाचा दाजी मनोज अंकुश घोडके (वय 30) याला पोलिसांनी अंत्यविधी होताच ताब्यात घेतले. त्यानंतर बुधवारी सकाळी यातील उर्वरित आरोपी राजाभाऊ ज्ञानदेव यादव (वय 21 रा. वांगी) व कृष्णा गोपीनाथ डाके (वय 27, रा. काठोडा) यांना अटक केली.