गेवराई – पोहायला गेलेल्या तिघांचा शेत तळ्यातल्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवार ता. 10 रोजी तालुक्यातील दैठण येथे घडली आहे. या दुर्दैवी घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान,
9 मे रोजी मायलेकराचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. तसेच, गेल्याच आठवडय़ात दोन जून रोजी मिरगाव ता. गेवराई येथील गोदापात्रात बुडून तिघींचा मृत्यू झाला होता.
गेवराई तालुक्यातील येथील सुनिल जगन्नाथ पंडित यांनी स्वतःच्या मालकीच्या शेतात काही दिवसांपूर्वी शेत तळे बांधले आहे. गुरूवार ता. 10 रोजी सुनिल पंडित यांच्यासह त्यांचा मुलगा पार्थ ( 10 ) व भाचा आदित्य गोरख पाटील ( वय 12 ) रा. मिरी, ता. शेवगाव, हे तिघेजण पोहायला गेले होते. त्यांचा एक छोटा मुलगा व त्यांची आई तळ्यावरती उभे होते. सुरूवातीला दोन्ही मुले पोहण्यासाठी तळ्तात उतरले व पोहू लागले. मात्र, काही वेळात त्यांना दम लागल्याने ते दोघेही पाण्यात बुडू लागले. सदरील बाब, सुनिल पंडित यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पाण्यात उडी मारली. त्यांची आई कालिंदा यांनी त्यांच्या दिशेने ठिबकची नळी ( पाईप ) फेकली. त्या नळीला धरून सुनिल यांनी मुलांसह वरती येण्याचा प्रयत्न केला. परंतू , ती नळी तुटल्याने तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यृ झाला आहे. विशेष बाब म्हणजे, वडील,भाऊ, मामे भाऊ बुडत असल्याचे दिसल्याने त्याने जवळच्या वस्तीवर पळत जाऊन घटना सांगितली.
मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. आई आणि चिमुकल्या मुलाने केलेले प्रयत्न दुर्दैवाने निष्फळ ठरले.
गेवराई पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान गेल्या आठवडय़ात मिरगाव ता. गेवराई येथील गोदापात्रात तिघींचा आणि 9 मे रोजी मायलेकराचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.