बीड – जिल्हा वासीयांसाठी एक म्हत्वाची बातमी असून येत्या सोमवारपासून सर्व दुकाने उघडण्यात येणार आहेत .बीड जिल्ह्यात लावण्यात आलेल्या कडक लॉक डाऊन मधील निर्बंध काही प्रमाणात कमी केले जाणार आहेत .येत्या सोमवारपासून नवे आदेश लागू होतील .ज्यामध्ये अत्यावश्यक सेवेशिवाय इतर दुकाने देखील उघडण्यास दुपारी चार वाजेपर्यंत परवानगी देण्यात येणार आहे .
राज्याचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांच्या स्वाक्षरीने राज्यासाठी काढण्यात आलेल्या आदेशानुसार नैसर्गिक आपत्ती विभागाने 3 जून पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर जी परिस्थिती आहे त्यानुसार पाच टप्पे केले असून सोमवारपासून या नव्या आदेशाची अंमलबजावणी होईल .
नैसर्गिक आपत्ती विभागाने यासाठी दोन गोष्टींना महत्व दिले असून त्यात एक म्हणजे ऑक्सिजन बेड ची संख्या आणि रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट,या निकषानुसार राज्यातील जिल्ह्यांची पाच विभागात विभागणी केली असून पहिल्या आणि दुसऱ्या टप्यातील जिल्ह्यात जवळपास लॉक डाऊन संपूर्णपणे हटविण्यात आला आहे .तर तिसऱ्या आणि चौथ्या विभागातील जिल्ह्यांमध्ये घातलेले कडक निर्बंध काही प्रमाणात सैल केले आहेत .
बीड जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या गटात आहे कारण जिल्ह्यात 47 टक्के ऑक्सिजन बेड वापरात असून पॉझिटिव्हीटी रेट हा 5 ते 10 टक्यांच्या दरम्यान आहे .त्यामुळे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेसह इतर दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील .मात्र अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने शनिवार आणि रविवारी बंद राहतील .क्रीडांगण, स्विमिंग पूल,गार्डन सकाळी पाच ते नऊ पर्यंत सुरू राहतील .शासकीय कार्यालयातील उपस्थिती 50 टक्के असेल .।
पहिला गट – पहिल्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ टक्क्यांहून कमी ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे.
दुसरा गट – दुसऱ्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ ते ४० टक्क्यांदरम्यान ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश दुसऱ्या टप्प्यात आहे.
तिसरा गट – तिसऱ्या गटात ज्या जिल्ह्यांमध्ये ५ ते १० टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ४० टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
चौथा गट – चौथ्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये १० ते २० टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ६० टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
पाचवा गट – पाचव्या गटात ज्या जिल्ह्यांमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आणि ७५ टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. पाचव्या गटात कायम रेड झोन असणार आहे. वरील ४ टप्प्यांमध्ये नसलेल्या सर्व जिल्ह्यांचा समावेश पाचव्या टप्प्यातील गटात करण्यात आला आहे.