आष्टी – कोरोनामुळे व्यापार बंद,शेतीत पीकलेलं विक्रीसाठी बाजारपेठ बंद,खायचे वांदे झालेले असताना आष्टी तालुक्यातील बळीराजावर नवं संकट कोसळलं आहे .तालुक्यातील तवलवाडी गावात घटसर्प या रोगाची लागण झाल्याने शंभर गायी आणि वासरांचा मृत्यू झाला आहे .या घटनेने एकच खळबळ उडाली आहे .
आष्टी तालुक्यातील तवलवाडी गावामध्ये मागील चार ते पाच दिवसांमध्ये 60 संकरित गाई आणि 40 वासरांचा घटसर्प आजाराने मृत्यू झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गाय व वासरे मृत्यूमुखी पडल्याने आष्टी तालुक्यात खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांचे सुमारे 70 ते 80 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
दरम्यान, मृत गायींचे शवविच्छेदन करून नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार घटसर्प आजाराने या जनावरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय देशमुख, डॉ. संतोष शामदीरे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी मंगेश ढेरे यांनी तवलवाडी गावाला भेट देऊन, संबंधित शेतकऱ्यांची भेट घेतली व त्यांना धीर दिला.
या घटनेने पशुवैद्यकीय विभागामध्ये खळबळ उडाली आहे. शुक्रवारी तवलवाडी गावामध्ये संभाजीनगर येथील विभागीय पशु रोग अन्वेषण प्रयोगशाळेचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रशांत चौधरी, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर रोहित धुमाळ, डॉक्टर वानखेडे यांच्या टीमने भेट दिली असून पाहणी केली आहे. तसेच आष्टी येथील तालुका पशुधन विकास अधिकारी डॉक्टर मंगेश ढेरे यांची टीम दोन दिवसांपासून तवलवाडी गावामध्येच तळ ठोकून आहेत.