मुंबई – 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यापर्यंत आपण राज्य सरकार मराठा आरक्षण बाबत काय निर्णय घेते त्याची वाट पाहणार आहोत,अन्यथा 7 जून ला रायगडावर येऊन आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येईल असा इशारा छत्रपती संभाजी महाराज यांनी दिला .मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते .
मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर संभाजी महाराज यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे .त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ,राज ठाकरे यांची भेट घेत आपली भूमिका मांडली .
त्यानंतर मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका विशद केली .ते म्हणाले की,राज्य सरकारने ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला समावेश करता येईल का हे सांगावे,काही मराठा नेते याबाबत बोलत आहेत,मात्र आपल्याला हे शक्य वाटत नाही,तरी महाविकास आघाडी मधील नेत्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट करावी .
यावेळी संभाजी महाराज यांनी तीन पर्याय सरकार समोर ठेवले,ज्यामध्ये
पहिला पर्याय: राज्य सरकारने तात्काळ रिव्ह्यू पिटीशन दाखल करावी. हा राज्य सरकारचाच विषय.
दुसरा पर्याय: रिव्ह्यू पिटीशन टिकलं नाही तर क्युरिटिव्ह पिटीशन दाखल करावी. हा शेवटचा पर्याय आहे. पण हा पर्याय अपवादात्मक आहे. त्यासाठी भक्कम पुरावे घेऊनच कोर्टात जावं लागणार आहे.
तिसरा पर्याय: ‘342 अ’ च्या माध्यमातून आपण प्रपोजल केंद्राकडे देऊ शकतो. राज्यपालांच्या माध्यमातून ते राष्ट्रपतींकडे जाणार. राष्ट्रपतींना योग्य वाटलं तर ते केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे देतील. त्यांना योग्य वाटलं तर ते संसदेकडे पाठवतील.
छत्रपती संभाजी महाराज यांनी 7 जून रोजी आंदोलनाची भूमिका घेतल्याने आता सरकार याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .