मुंबई – राज्यात शरद पवार यांच्या पुढाकाराने अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जाणीवपूर्वक मोठ्या आवाजात बोलतात,आपले मुद्दे रेटून नेतात,काँग्रेसचे मंत्री परस्पर निर्णय जाहीर करतात अशी तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पवार यांच्याकडे केल्याची माहिती समोर आली आहे .राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुळे शिवसेनेत अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे .
सुमारे 40 मिनिटे चाललेल्या या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून होत असलेल्या विधानांबद्दल नाराजी व्यक्त केली. विशेषतः जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतच प्रशासनाच्या कारभाराबद्दल घेतलेल्या भूमिका योग्य नसल्याचे ठाकरे यांनी पवारांना सांगितल्याचे समजते.
उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने मंत्रालयात बसतात, बैठका घेतात. मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रवादीचे मंत्री आपापले विषय आवाज चढवून रेटून नेतात. काँग्रेसचे मंत्रीही आपापली मते स्पष्टपणे मांडत असतात. काहीजण परस्पर निर्णय जाहीर करतात. त्यामुळे शिवसेनेतच नाराजीचा सूर आहे.
राष्ट्रवादीकडून आपली मुस्कटदाबी होत असल्याची भावना शिवसेनेच्या मंत्री-आमदारांमध्ये आहे. काही जणांनी हिंमत करून आपले म्हणणे मध्यंतरी उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवले आहे. त्यातच आता मराठा आरक्षण आणि पदोन्नतीतील आरक्षण या विषयावरून सरकारमध्येच कलह पेटला आहे. काँग्रेसमधील एका गटाने तर पदोन्नतीतील आरक्षणावरून सत्तेतून बाहेर पडण्याचीही तयारी दाखवली आहे. या सर्व विषयावर उद्धव यांनी पवार यांच्याकडे मन मोकळे केल्याचे समजते.