शिरूर कासार – शिरूर येथील सराफा व्यापारी विशाल कुलथे खून प्रकरणातील फरार असलेला मुख्य आरोपी ज्ञानेश्वर गायकवाड याच्या शोधासाठी पोलिसांनी त्याचा मामा आजीनाथ गायके याला ठाण्यात बोलावून प्रचंड त्रास दिल्यामुळे त्यांनी मंगळवारी सायंकाळी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे .शिरूर पोलिसांच्या या कुटाण्यामुळे पोलीस दलाची अब्रू वेशीला टांगली गेली आहे .
शिरूर शहरातील सराफा व्यापारी विशाल कुलथे याचा त्याच्याच मित्रांनी खून केल्याचे उघड झाले.यातील मुख्य आरोपी ज्ञानेश्वर गायकवाड व त्याच्या दोन मित्रांनी विशाल चा निर्घृण खून केल्याचे समोर आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली .मात्र मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे .
त्यामुळे शिरूरचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने आणि सपोनि रामचंद्र पवार यांनी गायकवाड याचा मामा आजीनाथ गायके याला ठाण्यात बोलावून प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास दिला .पोलिसांच्या या जाचाला कंटाळून अखेर गायके यांनी त्यांच्या दुकानात आत्महत्या केल्याची समोर आले .
हा प्रकार समोर आल्यानंतर गायके यांच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात रात्री बराच वेळ गोंधळ घातला .शिरूर पोलीस आरोपीला पकडण्यासाठी विनाकारण घरच्या लोकांना,नातेवाईकांना त्रास देत आहेत असा आरोप गायके यांच्या कुटुंबीयांनी केला आहे .
मुख्य आरोपी ठाण्यात पाच तास बसून गेल्यानंतर त्याची सखोल चौकशी करून त्याला अटक करण्याऐवजी त्याला सोडून देत इतरांना त्रास देऊन शिरूर चे पी आय माने आणि पवार हे कोणती मर्दुमकी दाखवत आहेत असा सवाल विचारला जात आहे .