शिरूर कासार – लग्न ठरले आहे मात्र सोनं घेण्यास विसरलो आहोत अस सांगून सराफा व्यापाऱ्याला सोनं घेऊन दुकानात बोलावून त्याचा निर्घृण खून करत मृतदेह दुसऱ्या जिल्ह्यात नेत पुरून टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे .शिरूर येथील सराफा व्यापारी विशाल कुलथे यांच्या खुनाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला आहे .
एखाद्या थ्रिलर हिंदी सिनेमाला लाजवेल असा प्रकार शिरूर तालुक्यात उघडकीस आला आहे .विशाल कुलथे यांना ज्ञानेश्वर गायकवाड याने माझे लग्न ठरले असून दागिने बनविण्याची ऑर्डर दिली .अनामत म्हणून पाच हजार रुपये देखील दिले .
त्यानंतर गायकवाड याने विशाल ला फोन करून आपल्या दुकानात बोलावून घेतले,त्यानंतर दुकानाचे शटर लावून घेत त्या ठिकाणी आपले मित्र धीरज मांडकर,संतोष लोमटे या दोघांच्या मदतीने विशाल याचा गळा दाबून आणि कात्रीने वार करून खून करण्यात आला .
त्यानंतर विशाल चा मृतदेह गोधडीत गुंडाळून तो गायकवाड याच्या मूळ गावी म्हणजे भात कुडगाव येथे नेऊन शेतात पुरून पुरावा नष्ट करण्यात आला .दरम्यान विशाल कुलथे हे गायब असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तपास सुरू झाला .
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत आणि पथकाने तपास करत धीरज आणि संतोष या दोघांना अटक करीत चौकशी केली असता त्यांनी सर्व हकीकत सांगितली .या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला असून मुख्य आरोपी गायकवाड हा फरार आहे .