मुंबई – राज्यात सध्या कोरोना सोबतच म्युकरमायकोसिस चे रुग्ण देखील मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत,या दोन्ही रोगांची लागण एकाचवेळी होऊ शकते अस मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे . त्यामुळे लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे .
कोरोना आणि म्युकरमायकोसिसची एकाचवेळी लागण होऊ शकते. ज्या कोरोना रुग्णांची प्रकृती अतिश्य गंभीर असेल किंवा ज्यांना एडस् आणि डायबेटीस यासारख्या सहव्याधी असतील त्या रुग्णांना कोरोना आणि म्युकरमायकोसिस एकाचवेळी होऊ शकतो. तसे झाल्यास रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते.
मात्र, सध्या भारतात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण होताना दिसत आहे. म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून हवेतूनही त्याचा प्रसार होऊ शकतो. सध्याच्या घडीला तरी याचा प्रसार रोखण्याचे तितकेसे प्रभावी मार्ग उपलब्ध नाहीत. केवळ योग्य वेळेत उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो.
म्युकर मायकोसिस या आजाराची लक्षणे म्हणजे ताप,सर्दी,नाकातून सतत पाणी वाहणे,डोकेदुखी,श्वास घेताना त्रास जाणवणे
कोरोनासोबत तुम्हाला आणखी काही बुरशीजन्य आजारांची लागण होऊ शकते. बुरशीजन्य आजाराचे साधारणत: एस्पेरगिलोसिस आणि कॅनडिडायसिस असे दोन प्रकार असतात. हवेतील बुरशी शरीरात गेल्यास या आजारांची बाधा होते.
एस्पेरगिलोसिस– एस्पेरगिलोसिस हा फुफ्फुसांचा आजार आहे. माती आणि झाडांवर आढळणारी बुरशी शरीरात गेल्यास या आजाराची लागण होऊ शकते.
इन्वासिव्ह कॅनडिडायसिस– कँडिडा बुरशीमुळे हा आजार होऊ शकतो. अँटीबायोटिक्स औषधे घेऊनही तुमचा ताप किंवा सर्दी जात नसेल तर तुम्हाला या आजाराची बाधा झाल्याची शक्यता आहे.
म्युकरमायकोसिस– हवेत असणाऱ्या काळ्या बुरशीमुळे या आजाराची लागण होऊ शकते. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या किंवा सहव्याधी असलेल्या लोकांना म्युकरमायकोसिसची लागण होण्याची शक्यता जास्त असते.