नवी दिल्ली – कोरोनाचा प्रभाव कमी व्हावा म्हणून तयार झालेले 2 डिजी हे औषध पुढच्या आठवड्यात भारतात उपलब्ध होणार आहे .भारतात डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेस आणि हैदराबादच्या डॉ. रेड्डी लॅबोरिटरीजच्या सहकार्याने 2-DG हे कोरोनावर प्रभावी असं औषध तयार करण्यात आलं आहे. या कोविड प्रतिबंधक औषधाला केंद्र सरकारच्या ड्रग्ज कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडिया या विभागानं गेल्याच आठवड्यात मंजुरी दिली होती. कोरोनावर प्रभावी ठरत असलेल्या या औषधाची 10 हजार डोसची पहिली बॅच पुढच्या आठवड्यात लाँच होईल अशी माहिती डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 2-DG औषध तोंडाद्वारे घेता येणारं औषध असून यामुळे रुग्ण लवकर बरे होत असल्याचं क्लिनिकल ट्रायलमध्ये समोर आलं आहे.
2-DG औषधाची पहिली बॅच 10 हजार डोसची असणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी हे औषध पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला लाँच होणार असून रुग्णांना ते देण्यात येईल. शुक्रवारी कर्नाटकचे आरोग्यमंत्री के सुधार यांनी डीआरडीओच्या प्रकल्पाला भेट दिली. त्यांना संशोधकांनी 2 DG औषधाबद्दलची माहिती दिली तसंच कोरोनाविरोधातील लढ्यात हे औषध कसं महत्त्वाचं ठरेल हेसुद्धा सांगितले.
क्लिनिकल ट्रायल्समध्ये 2-DG औषधामुळे रुग्णांना ऑक्सिजनची गरज कमी होऊ शकते. ज्या रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासते ती भरून काढण्या या औषधाची मदत होणार आहे. तसंच ज्या रुग्णांना 2 DG हे औषध देण्यात आलं त्यांची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह येण्याचं प्रमाणही जास्त आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेवळी कोरोनाशी लढण्यासाठी तयारी करण्याचे विविध घटकांना आवाहन केले होते. त्यावेळी डीआरडीओनं एप्रिल 2020 मध्ये 2-DG औषधावर काम सुरु केले होते. त्यानंतर या औषधाच्या क्लिनिकल ट्रायल्स घेण्यात आल्या. त्यामध्ये 2 DG औषध SARS-Cov-2 (कोविड-१९) या आजारावर प्रभावी ठरत असल्याचं समोर आलं. या औषधाच्या फेज-2 मधील क्लिनिकल ट्रायलला मे 2020 मध्ये परवानगी देण्यात आली होती. तर मे-ऑक्टोबर 2020 मध्ये डीआरडीओ आणि डॉ. रेड्डी यांनी मिळून फेज-2 च्या ट्रायल घेतली. फेज-2 च्या ट्रायल 6 रुग्णालयांत घेतल्या होत्या. यात 110 रुग्णांवर याची चाचणी झाली.