नवी दिल्ली – कोरोना पासून बचावासाठी प्रभावी असलेल्या लसीकरण बाबत अनेक शंका कुशंका असताना पहिला डोस घेतल्यावर दुसऱ्या डोस ला उशीर झाला तर पुन्हा नव्याने दोन डोस घ्यायचे का असेही प्रश्न विचारले जात आहेत,कारण सध्या लसीचा मोठा तुटवडा आहे,मात्र भारतातील तज्ज्ञांनी स्पष्टपणे सांगितले आहे की दुसरा डोस घेण्यास उशीर झाला तरी हरकत नाही .त्यामुळे 28 दिवस किंवा 45 दिवस झालेल्यानी काळजी करण्याची गरज नाही .
लशीचा पहिला डोस घेतलेल्या अनेक व्यक्तींचा दुसरा डोस लांबणीवर पडला आहे, याची आम्हाला कल्पना आहे. मात्र त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन या लशींच्या दोन डोसमध्ये (लशीनुसार) 4 ते 6 आठवड्यांचं अंतर असणं अपेक्षित असतं. मात्र ते 8 ते 10 आठवड्यांपर्यंत लांबलं, तरी काहीही फरक पडत नाही. एवढ्या अंतराने दुसरा डोस घेतला, तरी तो प्रभावीच ठरतो. दोन डोसमधलं अंतर वाढलं तरी पुन्हा पहिला डोस घेणं गरजेचं नाही,’ असं डॉ. अरोरा यांनी सांगितलं.
पुण्यातल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) या संस्थेतल्या इम्युनॉलॉजिस्ट डॉ. विनिता बाळ यांनी सांगितलं, ‘पहिल्या डोसमुळे शरीरातल्या प्रतिकारशक्तीला जी चालना मिळालेली असते, ती दुसऱ्या डोसला उशीर झाल्यामुळे नाहीशी होत नाही. पहिल्या डोसमुळे तयार झालेला प्रभावाचा दर्जा आणि परिणाम वाढवण्याचं काम दुसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस करतो.’
‘लसीकरण केंद्रावर गर्दी करणं ज्येष्ठांनी टाळावं. कारण त्यांना तिथे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येतनाही,’ असंही डॉ. बाळ यांनी सांगितलं.
पहिल्या डोसमुळे शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीज काही कालावधीनंतर विघटित होतात. त्यामुळे पहिल्या लशीमुळे तयार झालेली प्रतिकारशक्ती साधारणतः चार ते पाच महिन्यांनी कमी व्हायला सुरुवात होते.
कोविशिल्ड लशीच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये असं आढळलं, की दोन डोसेसमध्ये जास्तीत जास्त 12 आठवड्यांचं अंतर असलं, तरी लशीचा प्रभाव तितकाच राहतो, तो कमी होत नाही. कोव्हॅक्सिन लशीच्या दोन डोसमधल्या अंतराबद्दल अशा चाचण्या मानवामध्ये घेण्यात आलेल्या नाहीत.
‘कोव्हॅक्सिन लशीच्या निर्मात्यांनी 28 दिवसांच्या अंतराची चाचणी घेतली आहे. त्यामुळे त्या लशीचा दुसरा डोस 28 दिवसांनी घेण्याची शिफारस केली जाते. ज्या अर्थी चार आठवडे तो प्रभाव कायम राहतो, त्या अर्थी तो पाचव्या आठवड्यातही टिकून असणार. मात्र तसे पुरावे अद्याप तरी आपल्याकडे नाहीत,’ असं डॉ. बाळ यांनी सांगितलं.
पहिला डोस घेतल्यानंतर कोविड-19 चा संसर्ग झाला आणि त्यातून बरं व्हायला 6 ते 10 आठवडे लागले, तरी त्यानंतर त्या व्यक्तींनी लशीचा दुसरा डोस घ्यायला हवा, असं तज्ज्ञ सांगतात.