नवी दिल्ली – एकिकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतो आहे. अशात आता केंद्र सरकारने ऑक्सिजनची गरज कमी भासेल अशा औषधांवर भर दिलेला आहे. त्यापैकीच एक औषध म्हणजे झायडस कॅडिलाचं विराफिन हे अँटिव्हायरल औषध. कोरोना रुग्णांवर आपात्कालीन वापरासाठी या औषधाला मंजुरी दिल्यानंतर आता कंपनीने या औषधाची किंमत जारी केली आहे.विराफिनच्या एका डोसची किंमत 11,995 रुपये आहे, असं कंपनीने सांगितलं आहे.
या औषधामुळे रुग्ण लवकरात लवकर बरा होतो, असा दावा कंपनीने केला आहे. या औषधाची कोरोना रुग्णांवर चाचणी घेण्यात आली. या चाचणीत ज्या रुग्णांना औषध देण्यात आलं, त्यापैकी 91.15% रुग्णांची आरटी-पीसीआर चाचणी 7 दिवसांतच निगेटिव्ह आली, असं कंपनीने सांगतिलं आहे. औषधामुळे आजारामुळे निर्माण होणारी गुंतागुंतही कमी होते. शिवाय रुग्णाला ऑक्सिजनवर ठेवण्याचा कालावधीही कमी होतो, असं कंपनीनं सांगितलं
त्यामुळे हे औषध कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कंपनीने केली होती. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आपात्कालीन मंजुरी द्यावी अशी मागणी कंपनीने ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाकडे केली होती. 23 एप्रिलला डीसीजीआयने या औषधाला मंजुरी दिली आहे. आता या औषधाचा कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापर केला जाणार आहे. मध्यम स्वरूपाची लक्षणं असलेल्या रुग्णांना हे औषध दिलं जाणार आहे.