बीड – आठवडाभराने जगबुडी होणार आहे,किंवा भूकंप येणार आहे अथवा वर्षभर बाजारपेठ बंदच रहाणार आहे ,नेमकं होणार काय आहे असे प्रश्न निर्माण होण्यासारखी परिस्थिती मंगळवारी बीड जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठेत दिसून आली .लोक वेड लागल्यासारख घराबाहेर पडून किराणा ,भाजीपाला अन इतर सामान खरेदी करत होते,त्यांना न कोरोनाची भीती होती ना आपल्या कुटुंबाची .

बीड जिल्ह्यात गेल्या 25 मार्च पासून वाढते कोरोना रुग्ण लक्षात घेता प्रशासनाने कडक निर्बंध लावले .त्यानंतर राज्य शासनाने 15 मे पर्यंत लॉक डाऊन जाहीर केला .याच दरम्यान बीडच्या जिल्हाधिकारी यांनी मंगळवार अन बुधवार असे दोन दिवस किराणा व भाजीपाला मार्केट सुरू ठेवण्यास काही तास परवानगी दिली .
मंगळवारी बीडच्या मोंढ्यात जी गर्दी होती ती पाहिल्यानंतर या लोकांना कोरोनाची भीती राहिलीच नाही असे वाटले .दुष्काळातून आल्यासारखं लोक दुकानावर खरेदीसाठी गर्दी करत होते .अक्षरशः मोंढ्यातील सगळे रस्ते जाम झाले होते .कोणाच्याही तोंडाला मास्क नव्हता ना सोशल डिस्टन्स ना सॅनिटायझर चा वापर, प्रत्येक जण फक्त खरेदीसाठी मरमर करताना दिसून आला .

एकीकडे जिल्हाधिकारी यांच्यापासून ते आरोग्य विभागातील स्वीपर पर्यंत सगळे चोवीस तास काम करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी धडपड करत असताना लोक मात्र सगळी लाज नाकाला गुंडाळल्याप्रमाणे वागत आहेत हे चित्र रस्त्यावर दिसून आले .
बीड जिल्ह्यात परळी,अंबाजोगाई, केज,माजलगाव, आष्टी,शिरूर,पाटोदा,गेवराई या सगळ्या शहरात अशीच परिस्थिती दिसून आली .लोक ज्या पद्धतीने आणि जसे वागत आहेत ते पहाता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या या दोन दिवसानंतर शेकडोंनी वाढू नये म्हणजे झालं .