परळी – एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्वच खाजगी रुग्णालये आणि तेथील यंत्रणेवर स्वतः नियंत्रण आणले असताना दुसरीकडे परळीच्या थर्मल कॉलनीत असलेल्या सरकारी रुग्णालयावर मात्र कोणाचेच नियंत्रण नसल्याचे चित्र आहे,या ठिकाणी असलेल्या वैद्यकीय अधिकारी या वाट्टेल तेव्हा येतात अन वाट्टेल तेव्हा जातात,दहा फुटावरून रुग्णाची तपासणी करतात असे चित्र आहे,याकडे पालकमंत्री व संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे .
राज्यासह देशात सध्या कोरोनाचे संकट मोठे आहे .आरोग्य,महसूल,पोलीस आणि इतर सर्वच सरकारी विभागातील यंत्रणा कामाला लागलेली आहे .अशावेळी खाजगी रुग्णालयात देखील कोविड केयर सेंटर करून रुग्णांना उपचार दिले जात आहेत .बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते उपजिल्हा रुग्णालय पर्यंत प्रत्येक ठिकाणी ऑक्सिजन बेडपासून ते इतर सर्व सुविधा दिल्या जात आहेत .
अशावेळी परळीत मात्र वेगळाच कायदा अस्तित्वात आहे की काय असे चित्र आहे .परळीच्या थर्मल कॉलनीत असलेल्या सरकारी रुग्णालयाचा कारभार राम भरोसे नव्हे तर रांदड भरोसे सुरू आहे .या ठिकाणच्या वैद्यकीय अधिकारी या रुग्णांना दहा फुटावरून तपासणी करतात,दुसरे म्हणजे हाच रुग्ण त्यांच्या खाजगी रुग्णालयात गेला तर त्याची व्यवस्थित तपासणी होते,सरकारी रुग्णालयाची वेळ ठरलेली असताना आणि सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच आरोग्य सुविधा 24 तास उपलब्ध असताना हे रुग्णालय मात्र ठराविक वेळेतच सुरू असते अन बहुतांश वेळा बंदच असते .
रुग्णालयावर लाखो करोडो रुपये वर्षाला खर्च होत असताना त्याचा जर एवढ्या मोठ्या संकटात उपयोग होणार नसेल आणि तेथील यंत्रणेकडून रुग्णांना अपमानास्पद वागणूक मिळणार असेल तर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी यात लक्ष घालून या रुग्णालयात अधिकचे बेड आणि यंत्रणा देऊन कामचुकार डॉ रांदड सारख्या डॉक्टर मंडळींवर कारवाई करणे आवश्यक आहे .