बीड – जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या लॉक डाऊन दरम्यान कर्तव्यावर असताना चऱ्हाटा फाटा येथे पोलिसांनी डॉ विशाल वणवे यांना बेदम मारहाण केली,त्यामुळे डॉक्टर मंडळींनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला असून उद्यापासून बेमुदत कामबंद आंदोलन केले जाणार आहे .
बीड जिल्ह्यात वाढते कोरोना रुग्ण पाहता जिल्हाधिकारी यांनी तीन दिवस कडक लॉक डाऊन केले .या काळात विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी दंड आणि काठीचा प्रसाद दिला .मात्र हे करताना कर्तव्यावर असणारे शिक्षक,बँक कर्मचारी, महसूल व इतर शासकीय कर्मचारी यांना देखील मारहाणीचा प्रकार घडला .
बीडमध्ये उपअधीक्षक यांच्या पथकाने तर इतर ठिकाणी इतर पोलिसांनी शासकीय कर्मचारी यांना हेल्मेट नाही म्हणत मारहाण केली. लॉक डाऊन च्या काळात हेल्मेट आणायचे कोठून याचा विचार न करता पोलीस बळजबरी करत आहेत .
आष्टी तालुक्यातील टाकलसिंग येथील डॉक्टर विशाल वनवे हे कर्तव्यावर असताना चर्हाटा फाटा येथे पोलिसांनी त्यांना गुरासारखी मारहाण केली .त्यांनी ओळखपत्र दाखवले तरीही ही मारहाण केली गेली .त्यामुळे संतप्त झालेल्या डॉक्टर मंडळींनी याविरोधात आवाज उठवला आहे .
जोपर्यंत मारहाण करणारे पोलिसांवर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत लसीकरण आणि इतर कामावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे .