बीड – बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी कडक लॉक डाऊन लागू केल्यानंतर बीडच्या पोलिसांनी रस्त्यावर रझाकारी सुरू केली आहे .शासकीय कर्मचारी,बँकेचे कर्मचारी व मेडिकल स्टाफ ला हेल्मेट सक्तीच्या नावाखाली दंड करून मारहाण करण्याचे प्रकार सुरू आहेत .लॉक डाऊन मध्ये हेल्मेट आणायचे कोठून अन यातून पोलीस कर्मचाऱ्यांना सूट आहे का असा सवाल आता केला जात आहे .पोलिसांनी ही दादागिरी बंद करावी अशी मागणी होत आहे .
बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी तीन दिवसांचा कडक लॉक डाऊन लागू केला आहे .मेडिकल ,बँक आणि शासकीय कार्यालये वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवल्या आहेत .
मात्र हे करताना शहरात शासकीय कार्यालयात जाणारे कर्मचारी असोत की बँक कर्मचारी अथवा मेडिकल शी संबंधित कर्मचारी याना देखील पोलीस विनाकारण अडवणूक करत मारहाण करत आहेत .माळीवेस भागात पोलिसांनी एका मेडिकल वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला गुरासारखे बदडून काढले,त्याच्या हाताला टाके पडले आहेत .

तर शिवाजी चौकात हेल्मेट च्या नावाखाली अडवणूक केली जात आहे .एकतर लॉक डाऊन आहे ,त्यात शासकीय आणि बँकेचे कामकाज सुरू आहे,अशावेळी हेल्मेट आणायचे कोठून हा प्रश्न आहे .बर हे करताना पोलीस कर्मचार्यांना मात्र हेल्मेट नसले तरी विचारले जात नसल्याचे चित्र आहे .
वाहनावर गळ्यात आय कार्ड असले तरी पोलीस मात्र अरेरावीची भाषा करत आहेत .गाड्या अडवणे,शिवीगाळ करणे,अर्वाच्च भाषेत बोलणे,गाड्यावर लाथा मारणे असे प्रकार सुरू आहेत .बीडचे पोलीस अधीक्षक यांनी याकडे लक्ष। देण्याची गरज आहे .