बीड – ज्यांच्या हातात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम आहे तेच जर कायदे अन नियम पाळणार नसतील तर लोकांनी कोणाचा आदर्श घ्यायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे .रस्त्यावर विनामास्क ,विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर एकीकडे पोलीस कारवाई करत असताना सार्वजनिक कार्यक्रमात विनामास्क असणाऱ्या एस पी राजा रामस्वामी यांच्यावर कोण कारवाई करणार अशी चर्चा होऊ लागली आहे .
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दररोज हजार दीड हजाराच्या घरात जात आहे,जिल्हा रुग्णालयात तसेच कोविड केयर सेंटर मध्ये जागा कमी पडू लागली आहे .राज्य शासनाने लॉक डाऊन लावल्यानंतर देखील बीडकर रस्त्यावर मोकाट फिरत आहेत .त्यामुळे रुग्णसंख्या कमी होत नाही.

त्यामुळे आता पोलीस प्रशासनाने रस्त्यावर विनामास्क अन मोकाट फिरणाऱ्या लोकांची अँटिजेंन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे,याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे .मात्र हे करणारे जिल्ह्याचे पोलीस प्रमुख आर रामस्वामी यांनीच 1 मे च्या शासकीय कार्यक्रमात विनामास्क हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे .
ज्या शासकीय कार्यक्रमाला स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप,सीईओ अजित कुंभार,आ संदिप क्षीरसागर हे हजर होते अन या सगळ्यांनी मास्क लावला होता,एवढंच काय पण जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपायापासून ते अधिकाऱ्यांनी देखील मास्क लावले होते त्या कार्यक्रमात एसपी मात्र विनामास्क होते .हे त्यांच्यासारख्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला शोभणारे नाही .
जे कायदा राबवतात त्यांनीच कायद्याची पायमल्ली केली तर कसे चालणार,एकीकडे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे मास्क चा वापर करा म्हणून सूचना देत असताना दुसरीकडे एसपी जर हे आदेश न पाळता त्याला हरताळ फासणार असतील तर त्यांच्यावर कारवाई कोण करणार हा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे .