नवी दिल्ली – देशातील कोरोना बाधितांचा वाढत असलेला आकडा पहाता लवकरच सर्वव्यापी लॉक डाऊन किंवा कडक निर्बंध लागण्याची शक्यता आहे .केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या बैठकीत बहुतांश राज्यातील परिस्थिती लक्षात घेता पश्चिम बंगाल मधील तीन टप्पे वगळता सगळीकडे लॉक डाऊन होण्याची शक्यता आहे .केंद्रीय पातळीवर याबाबत वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत .
पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू आहेत. राज्यात एकूण आठ टप्प्यात मतदान होत आहे. यापैकी पाच टप्प्यांमधलं मतदान पूर्ण झालं आहे. तर तीन टप्पे शिल्लक आहेत. या तीन टप्प्यात असणारे मतदारसंघ वगळता उर्वरित पश्चिम बंगालचा समावेश देशव्यापी लॉकडाऊनमध्ये असेल, असं सूत्रांकडून समजतं. आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुद्दुचेरीतील मतदान पूर्ण झालं आहे. या सर्व राज्यांचे निकाल २ मे रोजी हाती येतील. मात्र तोपर्यंत थांबल्यास देशातील परिस्थिती आणखी भीषण होईल. त्यामुळेच पश्चिम बंगालमधील काही भाग सोडल्यास संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबद्दल एकमत झाल्याचं समजतं.
भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. रुग्णसंख्येने पुन्हा एकदा रेकॉर्ड मोडला आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल २ लाख ६१ हजार ५०० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १ हजार ५०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ४७ लाखांवर पोहोचली आहे.