गेवराई दि.१३ (प्रतिनिधी )
व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनाही बाजारसमितीच्या माध्यमातून दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले. कृषी उत्पन्न बाजार समिती, गेवराई च्या व्यापारी गाळे व फळे-भाजीपाला मार्केट बांधकामाचा शुभारंभ करताना ते बोलत होते.
गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी गाळे व फळे-भाजीपाला मार्केट बांधकामाचा शुभारंभ आज दि. १३ एप्रिल, मंगळवार रोजी गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी जि. प.चे सभापती बाळासाहेब मस्के, माजी सभापती कुमारराव ढाकणे, पांडुरंग कोळेकर, अप्पासाहेब खराद यांच्या शुभहस्ते विधीवत पूजा करण्यात आली.

यावेळी बोलताना अमरसिंह पंडित पुढे म्हणाले की, शेतकरी व्यापारी बांधवांना या ठिकाणी आपला शेतीमाल आणि फळ-भाजीपाला थेट विक्री करण्यासाठी याचा फायदा होणार असून आज या ठिकाणी शुभारंभ होत असलेल्या एकूण ११ कोटी ४३ लाख रुपये किंमतीच्या या कामामध्ये मुख्य महामार्गावर व्यापारी गाळे, १ हजार मे.टन क्षमतेचे गोदाम, शेतकरी सभागृह, लिलाव शेड, सौर पथदिवे, कंपाऊंड वॉल, कार्यालयीन इमारत, भुईकाटा फाऊंडेशन, मुख्य प्रवेशद्वार आदी कामांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.
यावेळी बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, उप सभापती शामराव मुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांच्यासह बाजार समितीचे सर्व संचालक, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सोशल डिस्टनिंग राखून उपस्थित होते. सदरील कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून संपन्न झाला.