बीड – बीड शहरासह जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा होत असलेला काळा बाजार व त्यामुळे होत असलेले रुग्णांचे हाल पाहून 9 एप्रिल रोजी नगर परिषदेचे गटनेते फारूक पटेल व नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी रेमडेसिविरचा काळाबाजार रोखण्या संदर्भात व खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित व संशयित रुग्णांना रेमडेसिविर तात्काळ उपलब्ध होण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. त्याची योग्य दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी काल झालेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीत हा विषय मंत्रीमहोदयां समोर चर्चेला घेतला. सदरील मागणीची योग्य दखल घेत राज्याचे सामाजिक न्याय तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात यावा अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या.
ज्या खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना बाधित किंवा संशयित रुग्ण उपचार घेत आहे, त्या रुग्णालयातील फिजिशियनचे (डॉक्टर) पत्र, रुग्णाचे आधार कार्ड व त्यासोबत सिटी स्कॅन (HRCT) केलेला रिपोर्ट जोडून ते पत्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गीते यांच्याकडे दाखल करावे व जिल्हा शल्यचिकित्सकांनी जिल्हा रुग्णालयातून रेमडेसिविर इंजेक्शन संबंधित रुग्णाला उपलब्ध करून द्यावे असे काल झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी सूचित केले.
जिल्हा रुग्णालयातून जे रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात येणार आहे ते लोन (कर्ज) स्वरूपात असेल. ज्या रुग्णालयातून रेमडेसिविर ची मागणी होणार आहे तेथे सदरील इंजेक्शन उपलब्ध झाल्यानंतर ते परत जिल्हा रुग्णालयाला परत करण्याचेही काल झालेल्या बैठकीत ठरले. जिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय पाहता पालकमंत्र्यांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे गटनेते फारूक पटेल व नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी पालकमंत्री धनंजयजी मुंडे यांचे बीड जिल्हा वासियांच्या वतीने आभार मानले आहेत.