बीड – मागच्या वर्षी सुरू झालेलं कोरोनाच संकट अद्यापही संपलेले नसताना जिल्हा रुग्णालय प्रशासन मात्र ढिम्म गतीने काम करताना दिसत आहे,तब्बल सातशे रुग्णांची सोय एकाच ठिकाणी असलेल्या लोखंडी सावरगाव येथील हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, नर्स आणि वॉर्डबॉय ची कमतरता तर आहेच पण पाण्याची सुद्धा सुविधा मिळत नसल्याने हे हॉस्पिटल म्हणजे बडा घर पोकळ वसा अन वारा जाई भसाभसा अस झालं आहे .याकडे स्वतः जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी लक्ष देण्याची गरज आहे .
बीड जिल्ह्यात मागच्या मे महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरवात झाली,जिल्हा रुग्णालयात जागा कमी पडू लागल्यानंतर आणि अंबाजोगाई चे एस आर टी फुल झाल्यानंतर तातडीने तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी लोखंडी सावरगाव येथील कोविड केअर सेंटर सुरू केले .गेल्या दहा महिन्यात या ठिकाणी असलेल्या दोन इमारतीमध्ये हे सेंटर सुरु आहे .
वर्षभराचा अनुभव गाठीशी असल्यानंतर आरोग्य विभाग विशेषतः जिल्हा रुग्णलाय प्रशासन गतीने कामाला लागले असेल असे वाटत होते,मात्र डॉ थोरात यांच्या जागी आलेले डॉ सूर्यकांत गित्ते यांनी अद्यापही ना जिल्हा रुग्णालयात लक्ष दिले आहे ना लोखंडी सावरगाव कडे लक्ष दिले आहे .
लोखंडी येथे तब्बल सातशे बेड उपलब्ध असून आजच्या काळात यातील साडेपाचशे पेक्षा अधिक बेड फुल आहेत,दररोज नांदेड पासून ते तेलगाव पर्यंत अनेक रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत आहेत .अंबाजोगाई चे एस आर टी रुग्णालय फुल झाल्याने रुग्णांना लोखंडी येथे दाखल केले जाते .या ठिकाणी शंभर रुग्णांसाठी 8 डॉक्टर असणे आवश्यक आहे अन मागच्या काळात होते देखील,त्याचसोबत 17 स्टाफ नर्स,8 वार्ड बॉय होते,मात्र आज पाचशे पेक्षा जास्त रिग्न असताना केवळ 12 एमबीबीएस डॉक्टर,24 स्टाफ नर्स आणि 20 वार्ड बॉय उपलब्ध आहेत .विशेष म्हणजे एकही एमएस किंवा एमडी डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध नाही .
या ठिकाणी सिटीस्कॅन मशीन किंवा पुरेसे व्हेंटिलेटर बेड नाहीत,केवळ इमारत असून उपयोग नाही तर या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर देखील असणे आवश्यक आहे .बाकीच्या सुविधा तर दूरच पण या ठिकाणी असलेल्या पाईप लाईनचे लिकेज होऊन आठवडा झाला तरी नगर पालिकेला लिकेज सापडलेले नाही .
त्यामुळे या ठिकाणी दररोज किमान आठ टँकर पाणी लागते मात्र केवळ चार टँकर उपलब्ध होत असल्याने रुग्ण अन डॉक्टर, स्टाफ यांना कसेतरी भागवावे लागत आहे .एकीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे कोट्यवधी रुपयांचा निधी आणत असताना डॉ गित्ते सारख्या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार वागण्यामुळे रुग्णांचे अन स्टाफचे मात्र हाल होत आहेत .
या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट देखील उभारला गेला आहे मात्र लिक्विड ऑक्सिजन टँकर उपलब्ध नसल्याने हा प्लांट सुरू होऊ शकलेला नाही .सिटीस्कॅन करण्यासाठी थेट चार किमी रुग्ण घेऊन एस आर टी गाठावे लागते,या ठिकाणची मशीन कधी सुरु असते तर कधी बंद,आहे तेथील रुग्णसंख्या दररोज किमान तीस चाळीस असल्याने लोखंडी च्या रुग्णांना वेटिंगवर राहावे लागते .
डॉ गित्ते हे बीडला रुजू होऊन चार महिने झाले तरीदेखील अद्याप त्यांनी लोखंडी च्या हॉस्पिटलमध्ये लक्ष घातलेले नाही,बाकी सुविधा सोडा पण ज्या प्रमाणे बीड मध्ये आयएमए ने रुग्णालयात सेवा देण्यास सुरुवात केली आहे तशी खाजगी डॉक्टर मंडळींनी लोखंडी येथे सेवा देण्यास सुरुवात केली तर अनेक प्रश्न सुटू शकतात मात्र त्यासाठी प्रशासन म्हणून डॉ गित्ते यांनी पुढाकार घ्यायला हवा .
प्रत्येक गोष्टीत पालकमंत्री यांनी लक्ष घालायचे तर मग डॉ गित्ते यांना सीएस म्हणून काय खुर्ची उबवायला बसवले आहे का असा प्रश्न निर्माण होतो .एवढं मोठं हॉस्पिटल केवळ अक्षम्य अशा दुर्लक्षामुळे अडचणीत सापडले आहे .जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनीच आता या बाबीकडे लक्ष देऊन गित्ते यांना टाईट करणे आवश्यक आहे .
कोणत्याही खाजगी इमारती ताब्यात घेऊन त्यावर लाखो करोडो खर्च करून बड्या बड्या बाता मारण्यापेक्षा आहे त्या ठिकाणी सुविधा,डॉक्टर, स्टाफ उपलब्ध करून दिल्यास खूप काही चांगले होऊ शकते .जगताप साहेब आता तुम्हीच लक्ष घाला अन सलाईन वर असलेली यंत्रणा बूस्टर डोस देऊन नीट करा एवढीच अपेक्षा आहे .