बीड / लक्ष्मीकांत रुईकर
राज्याच्या गृहमंत्र्यावर त्यांच्याच खात्यातील एक उच्चपदस्थ अधिकारी कोट्यवधी रुपये वसुली च टार्गेट दिल्याचा खळबळजनक आरोप करतो अन त्यानंतर दहा दिवसांनी हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर आणि न्यायालयाने दखल घेतल्यानंतर नैतिकतेची आठवण होते अन गृहमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देतात,पुन्हा वर सांगितले जात की चौकशीमध्ये बाधा येऊ नये म्हणून आणि नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिला.गृहमंत्री निर्दोष आहेत म्हणणारे आता ते कसे नैतिक आहेत याचा आरत्या ओवाळू लागले आहेत मात्र हे करायचंच होत तर एवढा उशीर का केला गेला,”बहोत देर कर दि महेमा आते आते”अशी अवस्था झाली असून या प्रकाराला ग्रामीण भाषेत नागवी नैतिकता म्हणतात हे निश्चित .
मागच्या दीड वर्षापूर्वी राज्यात महाविकास आघाडी अर्थात शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन्न झाले .शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाकडे मुख्यमंत्री पदाची धुरा आल्यानंतर सामान्य माणसाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या .मात्र कोरोना आला आणि सरकारच्या मर्यादा स्पष्ट झाल्या .
पडद्यामागून सरकार कोण चालवत आहे हे आता शेम्बड पोर देखील सांगू शकेल अशी अवस्था झाली आहे .
तीन पक्षाचे मंत्री अन आमदार कोणीच कोणावर खुश नाही मात्र नही मामु से नकटे मामु सही अशी अवस्था दिसते .सगळ्यांना सगळं माहीत आहे मात्र निदान मंत्रिपदाची खुर्ची आणि सेवेकरी तर चाकरीला आहेत ना मग बाकी कशाला विचार करायचा अस म्हणत हा गाडा हाकला जात आहे .

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक महत्वाच वाक्य म्हणले ते म्हणजे उद्धव ठाकरे यांच राज्य आहे की त्यांच्यावर राज्य आलं आहे .अगदी चपखल टिपणी आहे ही .आजतरी उद्धव ठाकरे यांच्यावर राज्य आपलं असून ते कदरून गेल्यासारखे झाले असावेत अशी परिस्थिती दिसते आहे .राज्यात कोणाचा पायपोस कोणाला नाही अस चित्र आहे .शिवसेनेचे मंत्री काय करतात हे संजय राठोड प्रकरणावरून दिसून आलं आहे .
एका तरुण मुलीनं आत्महत्या केल्यानंतर तब्बल दहा ते पंधरा दिवस हे मंत्री महोदय गायब होते,आले तेव्हा आपल्या समाजाचा दबावगट करण्याचा प्रयत्न केला गेला .बर सगळं करून झाल्यावर अधिवेशनात सरकारची उरलीसुरली अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली जाणार हे लक्षात आल्यावर मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेतला,पण दोन तिन दिवस स्वतःकडे ठेवून घेतला .

त्यानंतर राज्याच्या पोलीस दलातील बेकी समोर आली,एक साधा सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे हा किती कांड करू शकतो हे एव्हाना राज्याला नव्हे तर देशाला दिसून आलं .या प्रकरणात मोठ्यांचा हात असल्याचे विरोधक ओरडून सांगत होते,जनतेला सुद्धा ते दिसत होतं,पण सत्ताधारी मंडळी डोळ्यावर पट्टी बांधून बसले होते,त्यामुळे आम्ही त्यातले नाहीच असा आव आणला जात होता .
राज्याच्या माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी लेटरबॉम्ब टाकला आणि सगळं चित्र समोर आलं.आजपर्यंत पोलीस दल म्हणजे भ्रष्टाचार च कुरण हे लोकांना माहीत होतं,बोललं जातं होत,मात्र या प्रकरणामुळे सगळं उघड झाले .एका खोलीत अंधारात केलं गेलेलं पाप कधी न कधी उघड होत म्हणतात तसाच काहीसं यातही झालं .पोलीस अधिकाऱ्याने आरोप केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांचं पद धोक्यात येईल अस सर्वांना वाटत होतं,मात्र महाविकास आघाडी चे कर्ते करविते शरद पवार यांनी त्यांना अभय दिलं आणि मग पोलीस अधिकारी कसे भ्रष्ट आहेत,राजकारणी कसे स्वच्छ आहेत याचा कहाण्या सांगितल्या जाऊ लागल्या .वास्तविक पाहता आर आर पाटील यांच्यासारखा स्वच्छ प्रतिमेचा माणूस पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये कोणी या पदासाठी तयारच झाला नाही,त्यापूर्वी स्व गोपीनाथ मुंडे यांनी या पदाला एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं होतं .आजही लोकांना मेणगेट टू रामटेक हे आठवत अन गोपीनाथ मुंडे यांचा दरारा देखील आठवतो .

त्या काळात मुंडे यांनी मुंबई ला अंडरवर्ल्ड च्या जोखडातून मुक्त केलं तर आर आर आबांनी डान्सबार बंदी करत या पदाला मोठ्या उंचीवर नेलं .त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी हे पद आपल्याकडे ठेवलं अन त्याला न्याय देखील दिला .म्हणूनच शरद पवार यांनी साध्या राहणीमान असलेल्या अनिल देशमुख यांच्याकडे हे पद देऊन भाकरी फिरवण्याचा प्रयत्न केला,परंतु सगळ्यांचेच पाय मातीचे असतात हे पुन्हा एकदा दिसून आले .
राज्याच गृहमंत्री पद सांभाळणाऱ्या माणसाला कुठं काही खुट्ट झालं तरी त्याची सर्वात अगोदर माहिती असावी लागते .शरद पवार मुख्यमंत्री असतांना किल्लारी ला जो भूकंप झाला त्याच्या पाच मिनिटं अगोदर त्यांनी राज्याच्या पोलीस प्रमुखाकडून गणपती विसर्जन झालं का याची माहिती घेतली तेव्हा परभणी चा शेवटचा गणपती विसर्जित झाला आहे,याठिकाणी विशेष बंदोबस्त होता,साहेब आता चार वाजून गेलेत आपण निर्धास्त होऊन आराम करा अस अधिकाऱ्याने सांगितल्यानंतर पवार आराम करायला गेले अन पाचच मिनिटात काहीतरी हालचाल झाल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी तत्कालीन प्रधान सचिव यांना फोन लावून भुकंप कुठं झाला याची माहिती घेतली होती .
शरद पवार यांचाच दुसरा किस्सा त्यांनीच अनेकदा सांगितला आहे तो म्हणजे 1993 चे साखळी बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्यांनी माहिती घेतली तेव्हा 12 ठिकाणी हा प्रकार घडल्याचे कळले हे सगळे भाग अन त्याची माहिती घेतल्यावर पवार यांनी आकाशवाणी वरून आवाहन करताना मुंबईत 13 ठिकाणी स्फोट झाल्याचे म्हटले होते,त्यानंतर पोलीस प्रमुखांनी ही चुक लक्षात आणूं दिल्यावर त्यानी हे मुद्दाम सांगितल्याचे सांगत त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होणार नाही अस स्पष्टपणे सांगितले होत .
ही उदाहरण यासाठी आहेत की खात कोणतं का असेना पण त्यात सुई जरी इकडची तिकडं झाली तरी मंत्र्यांना माहिती असायला हवी,महाविकास आघाडी मध्ये मात्र सगळंच अलबेल असल्याचं दिसून येत .राज्याची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी ज्या मंत्र्यांवर आहे तेच जर मांडवली आणि वसुली साठी टार्गेट देत असतील अन हे आरोप कोणी राजकीय पक्ष नाही तर नोकरीत उच्चपदस्थ असणारा अधिकारी करत असेल तर अवघड आहे .
या आरोपानंतर हा अधिकारी इतक्या दिवस गप्प का बसला,तेव्हाच का नाही उत्तर दिले,ज्या काळात हे आरोप केले गेले त्या काळात मंत्र्यांची कोणाशीच भेट झाली नाही असे बालिश खुलासे केले गेले .पण हे सगळ्यांनाच माहीत आहे की,साध्या पी आय ला जरी मटका,गुटखा,जुगार,वाळू यांचे हप्ते वसूल करायचे असतील तरी तो स्वतः कधी डिल करत नाही,त्यासाठी मुन्शी,कलेक्शन वाले,डीबी असे अनेक पंटर असतात .
मग जर पीआय दर्जाचा माणूस एवढी काळजी घेत असेल तर मंत्री काय स्वतः पैशाची देवाण घेवाण करत असेल का .अन ते ही लाख रुपये कमी दिलेत का जास्त दिलेत हे मोजून थोडेच घेतले जात असतील .
महिन्याला शंभर कोटी पाहिजेत म्हणल्यावर खालचे अधिकारी अन यंत्रणा किमान सव्वाशे कोटी जमवत असणार हे उघड आहे .बर हे पैसे सगळे स्वतः मोजून घेतले जात नाहीत,हा सगळा व्यवहार मांडी आड करून खावा लागतो,पण परमवीर सिंग यांच्यामुळे हा व्यवहार उघड्यावर आला .
आता एवढं सगळं रामायण महाभारत झालं आहे म्हणल्यावर मूळ काँग्रेस कल्चर चे असणारे मोठे पवार तातडीने राजीनामा देण्यास सांगतील हा राजकीय धुरीणांचा होरा सपशेल चूक ठरला अन पवार देशमुख यांच्या पाठीशी उभे राहिले अन परमवीर सिंग हेच कसे खलनायक आहेत हे सांगण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यात स्पर्धा लागली .जो तो इतक्या दिवस परमवीर आणि सचिन वाझे यांच्याबाबत कौतुक करत होता तोच प्रत्येक सत्ताधारी राजकीय पक्ष या दोघांना आरोपी करून मोकळा झाला .
पण म्हणतात ना उपरवाले के लाठी मे आवाज नही होती पर वो जब भी पडती है बहुत जोर से लगती है,तसच काहीसं यातही झाल.लेटरबॉम्ब खोटा आहे,आम्ही कसे स्वच्छ आहोत,सरकार किती पारदर्शी आहे याचं गुणगान केलं जातं असताना जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशी लावली आणि आजपर्यंत हे सगळे आरोप खोटे आहेत म्हणणाऱ्यांना नैतिकता आठवली आणि त्यांनी तातडीने राजीनामा दिला .आता जयश्री पाटील कोण आहेत,त्यांचा बोलविता धनी कोण आहे याच्या उचपत्या केल्या जात आहेत .
वास्तविक पाहता जेव्हा अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली तेव्हाच गृहमंत्री म्हणून देशमुख यांनी वाझे यांच्यासारख्या वसुली एजंट ऐवजी वरिष्ठ अधिकाऱ्याला प्रकरण सोपवणे गरजेचं होतं,पण तस न होता हा सगळा प्रकार दुर्लक्षित केला गेला अन विधानसभेत भर अधिवेशनात वझेना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला गेला .बर गृहमंत्री सांगत आहेत म्हणल्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी तरी माहिती घेऊन बोलावे ना त्यांनी तर वाझे लादेन आहे का अस म्हणत या प्रकरणात सरकार किती सिरीयस आहे हेच दाखवू दिले .
शेवटी जे व्हायचं तेच झालं अन वाझे अडकला अन त्याला वाचविणारे देखील,आता या सगळ्या प्रकरणात आम्ही किती नैतिक आहोत,आमचा पक्ष कसा शिस्तीत अन प्रमाणिकतेवर चालतो याचे दाखले दिले जात आहेत .एवढीच जर नैतिकता होती तर आरोप झाल्यानंतर तातडीने राजीनामा का दिला गेला नाही,दहाबारा दिवस कशाची वाट पाहिली गेली,हे प्रश्न अनुत्तरित आहेत .असो काही दिवसात दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल,कदाचित देशमुख पुन्हा मंत्रिमंडळात देखील दिसतील अन तुमच्या माझ्यासारखी सामान्य जनता त्यांच्या भाषणावर टाळ्या पिटताना दिसेल,यालाच तर लोकशाही म्हणायचं,बाकी नैतिक अनैतिक अस काही नसतं हे सगळे सामान्य माणसाच्या मनाचे खेळ आहेत असच म्हणायचं .