मुंबई – शरद पवार यांनी युपीए चे नेतृत्व करावे असा सल्ला देऊन खळबळ उडवून देणाऱ्या संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर थेट हल्लाबोल केला,गृहमंत्रीपद अपघाताने मिळाल्याने त्याची किंमत नाही अस सांगत संशयास्पद व्यक्तींच्या कोंडाळ्यात राहून कारभार होत नसतो असा हल्लाबोल राऊत यांनी आपल्या रोखठोक मधून केला आहे .या रोखठोक मुळे महाविकास आघाडीत बिघडी होण्याची चिन्हे आहेत .
गेल्या काही महिन्यांत जे घडले त्यामुळे महाराष्ट्राच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. वाझे हा साधा फौजदार. त्याचे इतके महत्त्व का वाढले? हाच तपासाचा विषय. गृहमंत्र्यांनी वाझेंना 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग करतात. त्या आरोपांचा सामना करायला सुरुवातीला कुणीच पुढे आले नाही! सरकारकडे ‘डॅमेज कंट्रोल’ची योजना नाही हे पुन्हा दिसले, असे संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्राच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या घडामोडी गेल्या दोन महिन्यांत घडत आहेत. जे राष्ट्र आपले चारित्र्य सांभाळण्याची दक्षता घेत नाही ते राष्ट्र जवळजवळ नामशेष झाल्यासारखेच आहे असे खुशाल समजावे. जे राष्ट्र सत्य, सचोटी, सरळपणा आणि न्यायनिष्ठा या सद्गुणांची किंमत जाणत नाही आणि त्या गुणांना मानत नाही ते राष्ट्र जिवंत राहण्यालादेखील पात्र नसते. विलासी वृत्ती हेच ज्या राष्ट्राचे दैवत आहे, ज्या राष्ट्रातील लोक केवळ स्वतःसाठीच जगतात किंवा जेथे एखादी छोटी व्यक्ती स्वतःला देव समजते त्या राष्ट्राचे दिवस भरत आले आहेत, असे खुशाल समजावे. आज आपल्या देशाच्याच नव्हे, तर महाराष्ट्राच्या बाबतीत हे प्रश्न विचारले जात आहेत याचे दुःख वाटते, असेही यात म्हटलं आहे.
महाराष्ट्राचे एक मंत्री संजय राठोड यांना नैतिकतेच्या मुद्दय़ावर राजीनामा द्यावा लागला. ते प्रकरण खाली बसत नाही तोच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप केल्याचे प्रकरण आजही खळबळ माजवीत आहे. परमबीर सिंग यांच्या आरोपपत्रामुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरून जावे लागेल आणि सरकार डळमळीत होईल असे वातावरण निर्माण झाले होते. यापैकी काहीच घडले नाही. तरीही देशभरात या सर्व प्रकरणावर चर्चा झाली व महाराष्ट्राची बदनामी झाली!
महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला ठाकरे यांचे सरकार पाडण्याची घाई झाली आहे. त्यामुळे फाटक्या फुग्यात हवा भरण्याचे काम ते करीत आहेत. त्यांचे आरोप सुरुवातीला जोरदार वाटतात. नंतर ते खोटे ठरतात. पण अशा आरोपांमुळे सरकारे पडू लागली तर केंद्रातल्या मोदी सरकारला सगळय़ात आधी जावे लागेल, असेही मत राऊतांनी यात मांडले आहे.
मनसुख हिरेन व अँटिलिया स्फोटक प्रकरणात राज्य सरकारने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली केली. सिंग हे महत्त्वाकांक्षी अधिकारी आहेत. होमगार्ड महासंचालक पदावरील बदली ते सहन करू शकले नाहीत. त्यांच्या अस्वस्थतेत तेल ओतले ते गृहमंत्री देशमुखांनी. पोलीस आयुक्तांनी चुका केल्या, त्यामुळे त्यांना जावे लागले असे एक विधान देशमुखांनी करताच परमबीर सिंग यांनी 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट गृहमंत्र्यांनी कसे दिले होते, अशा पत्राचा स्फोट केला.
पुन्हा हे टार्गेट कुणाला दिले, तर मनसुख हिरेन या तरुणाच्या हत्येचा आरोप ज्यांच्यावर आहे त्या सचिन वाझेंना. सचिन वाझे हे आता रहस्यमय प्रकरण झाले. पोलीस आयुक्त, गृहमंत्री, मंत्रिमंडळातील प्रमुख लोक यांचा लाडका व भरवशाचा असा हा वाझे फक्त साधा सहाय्यक पोलीस निरीक्षक होता. त्याला मुंबई पोलिसांचे अमर्याद अधिकार कोणाच्या आदेशाने दिले हा खऱ्या चौकशीचा विषय आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयात बसून वाझे वसुली करीत होता तर गृहमंत्र्यांकडे याबाबत माहिती का नसावी? असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.
देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा आणि रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळय़ात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो.
अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’ असे वर्तन गृहमंत्र्यांचे असायला हवे. पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो हे विसरून कसे चालेल? असा सवालही सामनातून करण्यात आला आहे.