मुंबई – मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटक आणि कार प्रकरणात हलगर्जीपणा करणे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत .पक्षप्रमुख शरद पवार यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेतली असून दिल्लीवारी करून आलेल्या देशमुख यांच्या ऐवजी अजित पवार,जयंत पाटील किंवा मारठवड्यातील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर ही नवी जबाबदारी येऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे .
रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ गाडी सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यातच या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू आणि देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळातकेलेल्या खळबळजनक दाव्यानंतर या प्रकरणावरून मोठमोठे गौप्यस्फोट होऊ लागले होते. त्यादरम्यान, सचिन वाझेंना झालेली अटक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना हटवावे लागल्याने राज्य सरकारवर नामुष्की ओढवली आहे. त्यानंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांचेही पद जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदावरून दूर केल्यास त्यांच्या जागी अजित पवार किंवा जयंत पाटील या राष्ट्रवादीतील मोठ्या नेत्यांपैकी एकाकडे गृहमंत्रालयाचा कारभार जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. मात्र मिळत असलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे गृहमंत्रिपदासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याऐवजी तिसऱ्याच नेत्याचा गृहमंत्रिपदासाठी विचार करत आहेत. कोरोना काळात राज्याच्या आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळणाऱ्या राजेश टोपेंकडे गृहमंत्रालयाची जबाबदारी सोपवण्याचा शरद पवार यांचा विचार आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यास गृहमंत्रिपदासाठी राजेश टोपेंचे नाव आघाडीवर असेल, तसेच गृहमंत्रालयाचा कारभार त्यांच्याकडे जाईल अशी शक्यता आहे.