बीड – काही तासावर मतदान आलेले असताना भारतीय जनता पक्षाने बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालत निवडणुकीतून माघार घेतली आहे,भाजपच्या माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली .
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आठ जागांसाठी 20 मार्च रोजी मतदान होत आहे .या निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती,गुरुवारी धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी, काँग्रेस,शिवसेना अशा पक्ष पदाधिकारी आणि उमेदवार यांची बैठक घेऊन निवडणूक सिरीयस घेण्याच्या सूचना केल्या होत्या .
त्या अगोदर संस्था मतदार संघातील अकरा जागेवर एकही अर्ज वैध न ठरल्याने केवळ आठ जागांसाठी निवडणूक होणार होती, त्या दृष्टीने पंकजा मुंडे या शुक्रवारी जिल्ह्यात आल्या,त्या निवडणूक बाबत काहीतरी फिल्डिंग लावतील असे वाटले होते,मात्र जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या घरी आयोजित पत्रकार परिषदेत पंकजा यांनी भाजप या निवडणुकीत बहिष्कार टाकत असल्याचे सांगत खळबळ उडवून दिली .
भाजपने बहिष्कार टाकल्याने आता ही निवडणूक एकतर्फी होणार असून पंकजा मुंडे यांनी का माघार घेतली हे मात्र न उलगडणारे कोडे आहे .सत्ताधाऱ्यांनी लोकशाही प्रक्रिया पायदळी तुडवल्याचा आरोप करत बहिष्कार टाकत असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले .